पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले याने पदार्पणाच्या जागतिक मोटरस्पोर्टस स्पर्धेत रॅली पूर्ण करून गटात आठव्या क्रमांकासह उल्लेखनीय कामगिरी केली. डावीकडे स्टीअरिंग असलेली कार या सर्वोच्च पातळीवर बऱ्य़ाच कालावधीनंतर चालविणे तसेच टारमॅक मार्गावरील पहिलीच रॅली पूर्ण करणे यासाठी संजयला एफआयए या आंतरराष्ट्रीय शिखर संघटनेच्यावतीने खास पुरस्कार देण्यात आला.
फ्रान्समधील पोल रिका या जगप्रसिद्ध सर्कीटवर रविवारी ही रॅली पार पडली. संजयने रॅली 4 गटात भाग घेतला. ऑस्ट्रेलियाचा माईक यंग त्याचा नॅव्हीगेटर होता. एअरपेस संघातर्फे त्याने भारताचे प्रतिनिधीत्व केले. त्याने फ्रेंच बनावटीची प्युजो कार चालविली.
संजयने सांगितले की, पारितोषिक वितरण समारंभ सुरु होता तेव्हा माझ्या नावाची घोषणा झाली तेव्हा मला आश्चर्य वाटले. त्यानंतर मला फिनीशर्स करंडक देण्यात आला, जो सर्वसाधारणपणे विजेत्यांना दिला जातो. जागतिक रॅली मालिकेच्या (डब्लूआरसी) सुरक्षा समितीचे उपप्रमुख निकोलस क्लिंजर यांच्याहस्ते मला करंडक देण्यात आला. रॅलीत बहुतांश स्पर्धक तरुण होते. विशी-तिशीतील तरुणांच्या तुलनेत मी वयाच्या 54व्या वर्षी ज्या धाडसाने रॅली पूर्ण केली त्याचाही करंडक देताना विचार झाला. युरोपमधील माझी ही पहिलीच रॅली होती. त्यातही लेफ्ट हँड ड्राईव्ह कार तसेच टारमॅकचा मार्ग ही वेगळीच आव्हाने होते.
देशाचे प्रतिनिधीत्व करीत असल्यामुळे मला धोका पत्करायचा नव्हता. त्यासाठी रॅली पूर्ण करण्याचे प्राथमिक उद्दीष्ट ठेवले होते. याशिवाय मी फ्रान्समधील वाहतुकीचे नियमही मोडले नाहीत. मर्यादीत प्रवेश असलेल्या क्षेत्रात असे नियम मोडले जाण्याचे प्रकार सर्रास घडतात.
रॅली विभागात एकूण 38 स्पर्धकांनी भाग घेतला होता. संजयच्या गटात 12 स्पर्धक होते. पात्रता फेरीत संजयने नववा क्रमांक मिळविला. त्याने एक क्रमांक सुधारणा करीत आठवे स्थान गाठले. त्याच्या कारची पिरेल्ली टायर्सही कामगिरी उंचावण्यास उपयुक्त ठरली.
एकूण विचार केल्यास ही रॅली अनुभव वाढविण्यासाठी आणि नवे तंत्र शिकण्याच्यादृष्टिने बहुमोल ठरल्याची भावना संजयने व्यक्त केली.
संजयला सहाव्या स्टेजनंतर पुढील स्टेजसाठी वाहतुकीच्या टप्प्यातून जावे लागले. त्यावेळी त्याला आठ मिनिटे उशीर झाला. त्यामुळे त्याला 80 सेकंदांची पेनल्टी बसली. याचा त्याच्या क्रमवारीवर परिणाम झाला. याविषयी संजयने सांगितले की, बऱ्याच स्पर्धकांनी वाहतुकीचे नियम मोडून पुढील स्टेजच्या प्रारंभाचे ठिकाण लवकर गाठले, आम्ही मात्र तसे केले नाही. त्यामुळे उशीर झाला.
यंगने सांगितले की, संजय हा चांगला मित्र असल्यामुळे आणि पूर्वी जपानच्या कुस्को सुबारू संघात चार वर्षांचा सहकारी असल्यामुळे एकत्र रॅली चालविणे आनंददायक ठरले. दोन दिवसांत 14 स्टेज पूर्ण करून संजयने क्षमतेमध्ये सुधारणा झाल्याचे दाखविले. टारमॅक मार्गाचे आव्हान त्याने पेलले याचा उल्लेख करावासा वाटतो.
संजयने याआधी 2019 मध्ये फिनलंडमधील जागतिक रॅली मालिकेत डावीकडे स्टिअरिंग असलेली कार चालविली होती. त्यानंतर प्रथमच तो अशी कार चालवित होता. तीन दिवसांच्या रॅलीत पहिल्या दिवशी रात्रीची स्टेज होती, जी सर्कीटवर झाली. दुसऱ्या दिवशी टारमॅक मार्गावर त्याने एक क्रमांक उंचवला. जो त्याने तिसऱ्या दिवशी कायम राखली.